मुंबई पालिकेत सेनेची कोंडी, विरोधकांसह भाजपचा सभात्याग
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 09:34 PM (IST)
मुंबई : 'सामना'तील व्यंगचित्रावरुन शिवसेना अडचणीत सापडली असताना मुंबई महापालिकेमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्थायी समितीत खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन केवळ विरोधकांनीच नाही तर सत्ताधारी भाजपनंही सेनेला लक्ष्य करत सभात्याग केला आणि मोठ्या शिताफीनं खड्ड्यांचं खापर शिवसेनेच्याच माथी फोडलं. मुंबईतल्या खड्ड्यांच्या मुद्दयावरून सत्ताधारी शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी ऐनवेळी झालेली ही युती. अगदी भाजपनेही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या सुरात सूर मिसळवून सेनेविरोधात घोषणाबाजी केली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांवरुन चांगलाच गदारोळ झाला. खड्ड्यांचं खापर आपल्या डोक्यावर फुटू नये म्हणून भाजपनं देखील इतर पक्षांसोबत सभात्याग केला. मात्र मनसेनं भाजपचा हा डाव हाणून पाडण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मुंबईत फक्त 35 खड्डे असल्याचा दावा करुन मुंबई महापालिका प्रशासनानं स्वसःचं हसं करुन घेतलं आहे. कारण मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे हजारोच्या घरात आहेत. सोमवारी जेजे मार्गावर खड्डयामुळे 21 वर्षीय रिझवान खानचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेला मुंबईतले खड्डे बुजवता आले नाही. त्यामुळे आयुक्तांना पुढे करून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर आरोपाच्या फैरी झाडायला सुरूवात केली आहे. गेली अनेक वर्षे खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता खड्ड्यांचं राजकारणही चांगलच कळायला लागलं आहे आणि याची प्रचिती येत्या महापालिका निवडणुकांत आल्याशिवाय राहणार नाही.