मुंबई : मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचा नियोजित 'बेस्ट कर्मचारी वसाहत' दौरा रद्द झाला. बेस्ट बसने प्रवास करुन मिसेस फडणवीस मागाठणेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार होत्या. मात्र शिवसेनेच्या दबावामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.

बेस्टमधील भाजपच्या युनियनने 'बेस्ट बचाव' मोहिमेअंतर्गत अमृता फडणवीस यांचा दौरा आखला होता. मात्र शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या युतीच्या बोलणीवर याचा परिणाम होईल, अशी भीती घालत शिवसेनेना यामध्ये मोडता घातल्याचं बोललं जात आहे. 'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अमृता फडणवीस रविवार 3 फेब्रुवारी रोजी बेस्ट बसने दहीसर चेकनाका ते मागाठणे डेपो या मार्गावर प्रवास करणार होत्या. यावेळी त्या बेस्टमधील प्रवाशांशी गप्पा मारणार होत्या. तर मागाठणे डेपोत उतरल्यावर तेथील बेस्ट कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेणार होत्या.

निवडणुकांच्या तोंडावर मिसेस मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे शिवसेना हादरल्याचं बेस्टमधील भाजप युनियनचे सरचिटणीस गजानन नागे यांना वाटतं. हा उपक्रम आपल्याविरोधात जाण्याची भीती वाटल्यामुळे शिवसेनेकडून विरोध करण्यात आल्याचं नागे 'मिरर'ला म्हणाले.

गेल्या महिन्यात 'बेस्ट' कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप नऊ दिवस चालला होता. शिवसेनेला या संपात मध्यस्थी करण्यात अपयश आलं होतं. हायकोर्टाच्या निर्देशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी माघार घेतली होती.