मुंबई: डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे (Delai Road Bridge Lane)उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याची माहिती आहे. . 


गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात  बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. या विरोधात आता मुंबई महापालिका ॲक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळतेय.


या डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले होतं. असं असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 


महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.