नवी मुंबई : तब्बल तेरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) मेट्रोतून (Metro) प्रवास करता येणार आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वात आधी घोषणा करण्यात आलेल्या नवी मुंबई मेट्रोला इतका उशीर का झाला आणि अचानक कोणताही कार्यक्रम न ठेवता त्याचे उद्घाटन का करण्यात आलं या प्रश्नांची उत्तर आम्ही शोधण्याचा प्रयत्न केलाय.  भारतातला सर्वात जास्त काळ रखडलेला मेट्रो मार्गीकेचा प्रकल्प कोणता असेल तर त्याचे उत्तर म्हणजे नवी मुंबई मेट्रो मार्ग. तब्बल तेरा वर्षानंतर आज म्हणजेच शुक्रवार 17 नोव्हेंबरपासून बेलापूर ते पेंढर हा पहिल्या टप्प्याचा 11 किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या पहिल्या टप्प्यात 11 स्थानके आहेत. 


 मेट्रो सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक मेट्रो उपलब्ध असणार आहे. तसेच त्याचे तिकिटाचे दर हे दहा रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेत. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मात्र इतक्या सुविधा असूनही ही मेट्रो इतक्या विलंबाने का सुरू झाली हा खरा प्रश्न निर्माण होतो. 


काम का रखडतं गेलं? 


 1 मे 2011 साली नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्यक्षात कामाला सुरुवात नोव्हेंबर 2011 मध्ये झाली. या प्रकल्पाचे काम सिडको कडे देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हळूहळू हे काम रखडत गेले. कधी जागा अधिग्रहण तर कधी विस्थापित नवी मुंबईकरांच्या आंदोलनामुळे मेट्रोचे काम थांबत गेले. सुरुवातीला खारघर इथे जमीन अधिग्रहण करण्यात असंख्य अडचणी आल्या.  त्यानंतर सिडकोने मध्यंतरी काळात मेट्रो सोडून  नवी मुंबई विमानतळाच्या कामाकडे जास्त लक्ष दिले. निधी देखील तिथेच देण्यात आला.  मेट्रोचं काम करणारा  कंत्राटदार काम अर्धवट असताना बदलण्यात आला. त्यामुळे पूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागली. त्यात कोरोना काळात हे काम रखडलं. तसेच निधी देण्यात देखील सिडकोने हात आखुडता घेतला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते उद्घाटन


 मात्र इतके अडथळे पार केल्यानंतर देखील याच वर्षी या मेट्रोचे काम पूर्ण झाले. व्यावसायिक रित्या ही मेट्रो चालवण्यासाठी मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र सिडकोला प्राप्त झाले. खरंतर हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब ही मेट्रो सुरु करण्यास काहीही हरकत नव्हती मात्र असे झाले नाही. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प तसेच एमएमआर क्षेत्रातील विविध सार्वजनिक प्रकल्प थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न होता. मात्र गेल्या पाच महिन्यात अनेक वेळा पंतप्रधान कार्यालयाकडे वेळ मागून देखील नवी मुंबईच्या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख मिळत गेली.


अखेर 30 ऑक्टोबरला कार्यक्रम निश्चित होऊन देखील अखेरच्या क्षणी पंतप्रधान कार्यालयाकडून नकार आलेले या मेट्रोचे उद्घाटन रखडले.  एकीकडे पेट्रोलचा पहिला टप्पा तयार असून देखील प्रवाशांसाठी का खुली केली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि विरोधक विचारू लागले. 


मुख्यमंत्री शिंदेंचं आदेश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी अचानक नवी मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. ते देखील कोणत्याही औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमाशिवाय ही मेट्रो आता प्रवाशांसाठी खुली करण्यात आली असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे अचानक मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई मेट्रो लोकार्पित कशी केली असा देखील प्रश्न आता निर्माण होत आहे. मात्र यामागे पंतप्रधान कार्यालयाकडून उद्घाटनासाठी मिळत नसलेली योग्य वेळ जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान सध्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे मुंबईत येऊन देखील त्यांना नवी मुंबईत उद्घाटनासाठी जाता आले नाही. 


याआधी मुंबईतील मेट्रो 2A आणि 7 यांचे उद्घाटन स्वतः पंतप्रधानांनी केले होते. त्यांनी या मेट्रोतून प्रवास देखील केला होता. दुसरे कारण म्हणजे वाढता दबाव. चार महिन्यांपासून तयार असलेली मेट्रो सुरू होत नसल्याने पनवेल आणि नवी मुंबईतील नागरिकांचा रोष वाढत होता. विविध समाज माध्यमांवर देखील या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. तसेच याचा फायदा विरोधकांना होत होता. दुसरे कारण म्हणजे लोकांच्या उपयोगाचा प्रकल्प आम्ही राजकीय स्वार्थासाठी थांबवून ठेवत नाही हे आपल्या कृतीतून सरकारला दाखवायचे होते. त्यामुळेच शक्य असून देखील मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाचा कोणताही कार्यक्रम न घेता ही मेट्रो सर्वांसाठी खुली केली. 


आजपासून नवीन मुंबईची मेट्रो सुरू झाल्याने तब्बल एक लाख नागरिक या मेट्रोतून दररोज प्रवास करतील अशी शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी इतरही पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा तात्काळ विचार करावा अशी मागणी होत आहे. नवी मुंबईतील उरण पर्यंतचा रेल्वेमार्ग, दिघा रेल्वे स्थानक, मोठा गाव ब्रिज देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे लोकर पण सरकार कधी करणार हा खरा प्रश्न आहे.


हेही वाचा :


Navi Mumbai Metro : नवी मुंबईत पहिली मेट्रो धावली, स्थानकं, तिकिट दर ते वैशिष्ट्ये सर्व माहिती एका क्लिकवर