मुंबई: आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि बच्चू कडू यांची प्रहार संघटना एकत्र येण्याची शक्यता आहे. यासाठी अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले होते. या निवडणुकीत भाजप हा क्रमांक एकचा, तर भाजपचा मित्र पक्ष असलेला शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. आता नगरपालिका निवडणकीचे इतर तीन टप्पे आणि इतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा हा वारु रोखण्यासाठी शिवसेना विदर्भातील सहकाऱ्याच्या शोधात होती. त्यामुळे विदर्भात भाजपला उत्तर देण्यासाठी शिवसेना आमदार बच्चू कडू यांना पाठबळ देण्याची शक्यता आहे.
आमदार बच्चू कडू हे विदर्भातील एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. मार्च 2016 मध्ये त्यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केल्याचे प्रकरण प्रचंड गाजले होते. या शिवाय विदर्भातील अनेक समस्यांवर बच्चू कडू अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात.
त्यामुळे बच्चू कडू आणि शिवसेना एकत्र आल्यास विदर्भात शिवसेनेला भाजपविरुद्ध आक्रमक नेतृत्व मिळू शकते. या युतीने विदर्भातमध्ये शिवसेनेला जम बसवणे शक्य आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना पक्ष प्रमुख यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.