मुंबई: अमरावती एक्सप्रेसमध्ये गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या चार कार्यकर्त्यांनी दारु पिऊन धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दादर रेल्वे स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी आरोपीपैकी तिघांकडून नाममात्र दंडवसुल करुन सोडून देण्यात आलं आहे.
अधिक माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी अमरावती एक्सप्रेसमधून एक महिला अकोल्याहून मुंबई प्रवास करत होती. या प्रवासात अकोला ते भुसावळ दरम्याम रेल्वे बोगीतील चार व्यक्ती दारु पिऊन धिंगाणा घालत होते. यावर त्या महिला अधिकारीने या चारही जणांना हटकले असता, तिच्यावर अरेरावी करत रणजित पाटीला यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगून तुम्ही काही करु शकत नाही, असा दम त्या महिलेला दिला.
यानंतर या महिलेने दादर रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर चौघांविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर रेल्वे पोलिसांनी अरविंद मुरलीधर लांडे, योगेश नाटे, प्रमोद गायकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये दंड वसुल करुन सोडून देण्यात आले.
दरम्यान, रेल्वेमध्ये दारु पिऊन धिंगाणा घालणे हा कायदेशीर गुन्हा असताना, रेल्वे पोलिसांनी त्या तिघांवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून नाममात्र दंड वसुल करुन सोडून दिल्याने रेल्वे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.