मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पीरियडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचं वक्तव्य युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी केलं. काल मुंबईत त्यांची रॅली पार पडली. त्यावेळी ते एबीपी माझाशी बोलत होते.


"फक्त मंत्रीपद मिळालं म्हणून काही जणांना मुंबई माहिती झाली आहे. नाहीतर अनेकांना मुंबई माहिती तरी होती का?", असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. शिवाय, निवडणूक लढवायला मी कधीच नकार दिला नाही. जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर याचा विचार होईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील : संजय राऊत

आदित्य ठाकरेंआधी काल अमरावतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली होती. ते म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. मात्र, शिवसेना-भाजपमधील स्थिती थोडी वेगळी आहे. राज्य सरकारमध्ये एकत्र नांदत असलेले हे दोन्ही पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांचे कट्टर वैरी असल्याच्या आवेशात एकमेकांना झोडून काढत आहेत.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेत्यांची काही विधानं इतकी टोकाची आहेत की, राज्य सरकारचं भवितव्य काय असेल, यावर शंका उपस्थित व्हावी. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामागोमाग आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही राज्य सरकारच्या स्थैर्याबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेसाठी नवा मुद्दा मिळाला आहे. मात्र, शिवसेना-भाजपचं राज्यात काय होणार, हे येणारा काळच ठरवेल.