मुंबई : मातोश्रीजवळचा नाला साफ झाला नाही म्हणून आज चक्क शिवसैनिक आणि मुख्य अभियंता यांच्यात बाचाबाची झाली. विशेष म्हणजे हा नाला साफ न झाल्याचं उद्धव ठाकरेंनी महापौरांना लक्षात आणून दिलं होतं. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नाला साफ करण्याचे आदेश देऊनही हा नाला साफ न झाल्यानं महापौरांची अभियंत्यासोबत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे.

Continues below advertisement


'मातोश्री' बंगल्याजवळचा नाला साफ झाला नाही म्हणून शिवसैनिकांची पर्जन्यजलवाहिनी विभागाचे मुख्य अभियंता विद्याधर खंडकर यांच्यासोबत बाचाबाची झाली. 'मातोश्री'जवळच्या ओएनजीसी नाल्याची महापौर पहाणी करत असतांना शिवसैनिक आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी विद्याधर खंडकर आणि महापौरांमध्येही शाब्दिक वादावादी झाल्याचं समोर येत आहे. या गोंधळात शिवसैनिक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचंही सूत्रांकडून समजत आहे.



कलानगर भागात ओनएनजीसी समोरील नाल्याची सफाई न झाल्यानं या भागात पाणी तुंबलं होतं. याकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महापौरांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळे महापौरांनी 60 जूनला नाल्याची पाहणी केली, त्यावेळी तेथे कोणतच काम झालं नव्हतं.


महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज दुपारी नाल्याची पुन्हा पाहणी केली. काम न झाल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु विद्याधर खंडकर यांनी उद्धट भाषा वापरली असा आरोप केला जात आहे. त्यामुळे उपस्थित शिवसैनिकांनी खंडकर यांना धक्काबुक्कीही केल्याचं समजत आहे.


'मातोश्री'ला त्रास होऊ नये म्हणून आक्रमक होणारे शिवसैनिक आणि महापौर जेव्हा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो तेव्हा असतात कुठे हा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत.