कल्याण : कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई करत 'टक टक' गँगला बेड्या ठोकल्या आहेत. या गँगवर आजपर्यंत राज्यभरात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. राज्याबाहेरही या गँगविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे, मात्र त्यांना पकडण्यात आजपर्यंत कुणालाही यश आलं नव्हतं.

कल्याणमध्ये सोमवारी एका संशयित बाईकस्वाराला पकडल्यानंतर पोलिसांना 'टक टक' गँग पंजाब नॅशनल बँकेवर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या 9 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. ही गँग बँकेतून पैसे काढून जात असलेल्या लोकांचं लक्ष विचलित करून त्यांना लुटायची. यासाठी कधी अंगावर घाण पडल्याच्या, तर कधी पैसे पडल्याच्या थापा मारत ही टोळी लोकांना गंडा घालत होती. तसंच कारचालकांच्या काचेवर टकटक करून ही टोळी कारचालकांनाही लुटत होती. या गँगकडून पोलिसांनी कारची काच फोडण्यासाठी वापरले जाणारे छर्रे, मिरची पावडर, सुरे, चॉपर यासह खुजली पावडर हस्तगत केली आहे. ही पावडर अंगावर टाकून ही गँग लोकांना लुटत होती.

मूळच्या आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातल्या असलेल्या या गँगवर ठाणे पोलीस आयुक्तालयात 20, तर महाराष्ट्रात 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. शिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेशातही अनेक गुन्हे दाखल आहेत. एखाद्या भागात महिनाभर राहून बांधकाम मजूर असल्याचं ते भासवायचे आणि रेकी करून गुन्हे करायचे. या गँगला पकडण्यात आजवर कुणाला यश आलं नव्हतं. मात्र अखेर कल्याण पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या असून ही कारवाई मोठी आणि महत्त्वाची मानली जाते आहे.