मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लोकांनी जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी केली. मात्र, बँकांबाहेरील लोकांच्या या गर्दीचाही राजकीय फायदा उचलण्यासाठी राजकीय पक्ष पुढे सरसावलेले दिसत आहेत.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेनेचा फंडा

 

मुंबईतील बोरिवलीमधील बँकेबाहेर तासन तास उभ्या असलेल्या लोकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चहा आणि बिस्किटांचं वाटप केलं. लवकरच मुंबई पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून असे फंडे शोधले जात आहेत का, असा प्रश्न विचारला जातो आहे.

नोटाबंदीचा पंतप्रधान मोदींचा निर्णय

 

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिंसेंबरची मुदत दिली आहे.

देशभरात गोंधळाचं वातावरण

काळ्या पैशाविरोधातील लढाई आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, देशभरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झाले आहे.