Sunil Raut : संजय राऊतांचा (Sanjay Raut) आवाज बंद करण्याचं काम सध्या सुरु आहे. हे काम भाजपच्या मदतीनं ईडी करत असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी केलं. संजय राऊत यांना अडकवायचे. आमच्या कुटुंबाला त्रास द्यायचा. शिवसेनेचा आवाज बंद करायचा म्हणून हे सगळं कारस्थान सुरु असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी एक टक्क्याचाही भ्रष्टाचार केला नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावान कट्टर शिवसैनिक आहेत. ते कधीही भ्रष्टाचार करणार नाहीत. कारण बाळासाहेबांनी आम्हाला चांगली शिकवण दिली असल्याचे सुनिल राऊत यांनी सांगितलं.


शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. एकीकडे गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पीएमएलए न्यायालयानं संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे ईडीनं राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यामुळे संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) चौकशी होणार आहे. 6 ऑगस्ट म्हणजेच, आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांची चौकशी सुरु झाली आहे. 


गुरुवारी (4 ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत संजय राऊत त्यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहारांबाबत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला होता. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचंही ईडीनं यावेळी पीएमएलए कोर्टात युक्तीवादा दरम्यान सांगितलं होतं. ईडीची कारवाई राजकीय हेतून केली गेली, असा युक्तिवाद राऊतांच्या वकिलांनी केला होता. तर दुसरीकडे संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं होतं. दरम्यान, यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा ईडीनं वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: