दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती. मात्र त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी मात्र कायदाच हातात घेतला.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करून देणारा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. देशातील तरूणांना बिथरवू नका, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील हिंसाचारावर पहिल्यांदाच भाष्य केले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, देशात अशांतता आणि अस्वस्थततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसंच वातावरण देशात पुन्हा निर्माण केलं जात आहे की काय? अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे. 'ज्या देशात तरुण बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तरुणांना बिथरवू नका. ते भावी आधारस्तंभ आहेत. तरुण आपली शक्ती आहेत. हा तरुण बॉम्ब आहे, त्याची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करु नये', अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ : जामियातील हिंसाचार जालीयनवाला बागेची आठवण करून देणारा : उद्धव ठाकरे