मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मोठं रणकंदन सुरु आहे. मात्र या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात होती. किंबहुना, शिवसेना भूमिका घेण्यास टाळाटाळ करत होती. मात्र आता शिवसेना अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांच्या बाजूने लढण्याससरसावली आहे.


शिवसेनेशी संलग्न असलेल्या ‘मुंबई फेरीवाला सेना’ या संघटनेनं फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी मुंबईभर मोठी तयारी सुरु केली आहे. यासाठी  शिवसेनाप्रणित मुंबई फेरीवाला सेना या संघटनेची नियोजन बैठक गोरेगाव येथे पार पडली.

या बैठकीत  फेरीवाल्यांवर सध्या होत असणारी कारवाई थांबवून फेरीवाल्यांना तातडीनं पर्यायी जागा द्याव्यात, ही मुख्य मागणी मांडण्यात आली.

सध्या परवानाधारक अधिकृत फेरीवाल्यांवरही मुंबई महापालिका प्रशासन कारवाई करत आहे. यात अनेक मराठी फेरीवाले आहेत. ज्यांचं जगण्याचं, रोजीरोटीचं साधनच हिरावून घेतलं जात आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या बाजूने लढा देऊ, अशी भूमिका शिवसेनाप्रणित संघटनेनं मांडली आहे.

मुंबई फेरीवाला सेनेचे पदाधिकारी लवकरच शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे प्रमुख सूर्यकांत महाडिक यांची भेट घेऊन, त्यांची मागणी आणि भूमिका महाडिकांना सांगणार आहेत. त्यामुळे शिवसेने उघडपणे फेरीवाल्यांच्या बाजूने उतरणार की संलग्न असलेल्या मुंबई फेरीवाला सेनेच्या माध्यमातून यात उतरेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवाय, फेरीवाल्यांचा प्रश्न तापूनही आतापर्यंत मूग गिळून गप्प असणारी शिवसेना आता काँग्रेसप्रमाणेच फेरीवाल्यांना पाठीशी घालतेय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.