मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मविआमध्ये राहायचं नाही, पण मुंबईबाहेर मविआसोबत लढायचं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला स्वबळ चाचपून पाहायचं आहे पण ते फक्त मुंबईत. आता हा फॉर्म्युला कालपर्यंत ठाकरेंविरोधात लढणाऱ्या काँग्रेससारख्या मित्रपक्षांना किती पसंत पडेल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मुंबईत फारसं अस्तित्व नसल्याने ठाकरेंनी काहीही ठरवलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फायदाच होईल अशी स्थिती आहे. स्वबळावर लढण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेवर काय परिणाम होईल, त्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. 


महापालिका निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढायची की स्वबळावर यावर ठाकरेंच्या शिवसेनेत खल सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी याबाबत भाष्यही केलं होतं. खासदार संजय राऊत यांनी स्वबळाची भूमिका स्पष्ट करुन सांगितली. शिवसेनेचा स्वबळाचा नारा हा फक्त मुंबई महापालिकेपुरता आहे यावर त्यांनी भर दिला. 


मुंबईपुरतं स्वबळावर आणि इतर ठिकाणी मविआसोबत या राऊतांच्या भूमिकेवर नागपूर काँग्रेसमधून पुन्हा उत्तर मिळालं. नागपूरमध्ये काँग्रेसची स्वबळावर लढायची तयारी आहे, मात्र निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.


राष्ट्रवादीची सावध भूमिका


ठाकरेंच्या स्वळाबाबत मविआतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या आधीही सावध भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे फार ताणणार नाहीत असं भाकीत स्वत: शरद पवारांनी करुन झालं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मुंबई पालिका निवडणूक ठाकरेंसोबत राहणार असल्याचे संकेत दिले.


दरम्यान, स्वबळाची चाचपणी करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर  प्रविण पाटील तसंच कोल्हापूर, सांगली, मुंबईतील वरळी, विलेपार्लेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेंच्या पक्षात सामील झाले.


शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मात्र संजय राऊतांच्या स्वबळाच्या दाव्यावर सडकून टिका केली. संजय राऊत यांनी स्वतःचा पक्ष काँग्रेसच्या दारात नेऊन ठेवला आहे. शरद पवारांनी आज उद्धव ठाकरेंच्या खासदारांना भूमिका घ्यायला लावली आणि स्वतःचे खासदार अनुपस्थित ठेवले. ⁠यावर संजय राऊत यांनी बोलावं. ⁠संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याचे पाप केले, त्यांनी महाकुंभात जाऊन डुबकी मारावी असं नरेश मस्के म्हणाले. 


उद्धव ठाकरे आता स्वबळाची भाषा का करत आहेत? याचा त्यांच्या पक्षावर काय परिणाम होईल आणि महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल याचा अंदाज लावणं सध्या तरी कठीण आहे. 


महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा सुरु असताना, महायुतीतील राष्ट्रवादीनेही स्वबळाची चाचपणी उरकून टाकली. जिथे शक्य आहे त्या जिल्ह्यात आम्ही स्वबळावर लढू. जिथे विरोधक प्रबळ आहेत तिथे एकत्रच लढावं लागेल. त्याचा योग्य वेळी याचा निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. 


बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईत ठाकरे ब्रँड मजबूत होता. बाळासाहेबांनंतर तो तितका मजबूत राहिला नाही याची झलक गेल्या महापालिकेला मिळाली होती. भाजपने मुसंडी मारत शिवसेनेइतक्या 80-82 जागा मिळवल्या होत्या. लोकसभा, विधानसभा निकालानंतर मुंबईतील स्थितीही बदलली आहे. त्यानुसार ठाकरेंना पावलं उचलावी लागतील एवढं नक्की.


ही बातमी वाचा: