मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात बंड करताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. नवाब मलिक सारख्या देशद्रोही व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवले असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला होता. आता मात्र, शिंदे यांच्या गटातील आमदाराने आज नवाब मलिक (Nawab Malik) यांची भेट घेतली. कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांनी यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांचा अंतरीम जामीन मंजूर केला. प्रकृतीच्या कारणास्तव हा जामीन देण्यात आला. त्यामुळे जवळपास दीड वर्ष तुरुंगात असलेल्या मलिक यांची सुटका झाली आहे. मलिक आपल्या घरी परतले असून अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आदी नेत्यांचाही समावेश आहे. तर, अजित पवार, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनीदेखील मलिक यांची भेट घेत चर्चा केली.


मलिकांच्या भेटीवर कुडाळकर काय म्हटले?


मलिकांना भेटण्यासाठी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची रीघ लागली असताना दुसरीकडे आज शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर हे देखील मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांच्यावर या आधी जोरदार टीका केली असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मात्र नवाब मलिक यांच्या भेटीसाठी पोहचले.  शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी नवाब यांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी कुडाळकर यांनी पुष्पगुच्छ आणि शाल दिली. त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. या वेळी त्यानी आपण मलिक हे आजारी असल्याने भेटण्यास आलो असे कुडाळकर यांनी म्हटले. मलिक हे आमच्या विभागाचे आमदार होते. त्यांनी चांगले काम केले होते, काही वेळेस त्यांनी मार्गदर्शन केले होते. मलिक ज्येष्ठ नेते आहेत, आरोपांबाबत कोर्टात काय ते स्पष्ट होईल. मात्र, आज आपण माणुसकीच्या भावनेतून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.


मलिक हे अजित पवार गटासोबत आल्यास....


मलिक हे अजित पवार गटाबरोबर आमच्यात आल्यास चांगलेच आहे अशी प्रतिक्रिया कुडाळकर यांनी भेटीनंतर दिली.