मुंबई : मुंबईतील अंधेरीमधील (Andheri) एमआयडीसी परिसरात पाच कामगारांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांवर जोगेश्वरीच्या (Jogeshwari) ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  सुरुवातीला गावठी दारु (Liquor) प्यायल्यामुळे एकाचा मृत्यू आणि इतर चार जणांची प्रकृती बिघडल्याचं म्हटलं जात होतं. परंतु फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर या सगळ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. 


रामबाबू फुलंकर यादव असं मृत कामगाराचं नाव असून तो 32 वर्षांचा होता. तर किसन शाम यादव, श्रवण गणेश यादव, गोविंद गोपण यादव आणि दीपक गणेश यादव अशी उपचार सुरु असलेल्या कामगारांची नावं आहेत. स्वातंत्र्यदिनाला या कामगारांना सुट्टी असल्यामुळे हे सर्व जेवण करुन दरवाजा बंद करुन झोपी गेले. 


दरवाजा उघडला असता पाचही जण बेशुद्धावस्थेत आढळले


सूत्रांच्या माहितीनुसार, हे पाच जण एमआयडीसी परिसरातील जीजामाता रोडवर असलेला ब्रह्मदेव यादव चाळीत राहतात. 16 ऑगस्ट रोजी जेव्हा फुलो यादव नावाच्या त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीने दरवाजा ठोठावला. मात्र ते दरवाजा उघडत नव्हते. त्यानंतर फुलो यादवने कसातरी दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर पाचही जण बेशुद्धावस्थेत असल्याचं आढळले. यानंतर त्या सगळ्यांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी पाचपैकी एका कामगाराचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. तर उर्वरित चार जणांवर उपचार सुरु आहेत, असं माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.


फॉरेन्सिकच्या अहवालात अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर


एमआयडीसी पोलिसांनी सर्व कामगारांच्या रक्ताचे, उलटीचे आणि इतर नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले. त्यात या सगळ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून तपासाला सुरुवात केली आहे. तसंच रामबाबू यादवचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.


सुरुवातीला गावठी दारु प्यायल्याने मृत्यू झाल्याची माहिती


अंधेरी पूर्व परिसरातील पंप हाऊस परिसरात गावठी दारु प्यायल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर सगळ्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गावठी दारुमुळे कामगाराचा मृत्यू झाला का याची खात्री करण्यासाठी चाचणी करण्यात आली. परंतु त्यांच्या शरीरात दारु आढळली नाही. त्यानंतर फॉरेन्सिकच्या अहवालात त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं.


संबंधित बातमी


Mumbai News : मुंबईतल्या अंधेरीत गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती चिंताजनक; पंप हाऊस परिसरातील धक्कादायक घटना