मुंबई :  यंदाच्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) सभेसाठी शिवाजी पार्क मैदानावरून (Shivaji Park) शिवसेनेच्या ठाकरे (Shiv Sena UBT) आणि शिंदे (Shiv Sena Shinde Faction) गटात वादाची ठिणगी पडणार असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठीचा अर्ज मागे घेतला. त्यानंतर आता शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 


शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई महापालिकेकडून आता ठाकरे गटाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
 


मागील वर्षीच शिवाजी पार्क बाटवलं


परवानगीसाठीचा अर्ज मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले असल्याची बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. 






बाळासाहेबांच्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही


बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ असेही त्यांनी म्हटले. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.


कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.