Shiv Sena Saamana On Maharashtra Government  : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  या घटनेनंतर सामनाच्या अग्रलेखात सातत्यानं भाष्य केलं जात आहे. सामनाच्या अग्रलेखात आज देखील नव्या सरकारवर टीका केली आहे. 


सामनामध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे जे राजकीय नाट्य घडवले जात आहे, त्या नाट्याचे अद्याप किती अंक बाकी आहेत याविषयी आज तरी कोणीही ठामपणे काही सांगू शकेल असे वाटत नाही. घडामोडीच अशा घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत की, राजकीय पंडित, चाणक्य व पत्रपंडितांनीही डोक्याला हात लावून बसावे. स्ट्रोक-मास्टर स्ट्रोक असे नाटकाचे प्रयोग सादर केले गेले. एक पडदा पडला की दुसरा पडदा वर असेही प्रकार झाले. या संपूर्ण राजकीय नाट्याची पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्या तथाकथित 'महाशक्तीं'चा 'पर्दाफाश'ही मधल्या काळात झाला. निदान त्यानंतर तरी हे नाट्य संपुष्टात येईल असा काहींचा कयास होता, मात्र तसे होताना दिसत नाही. उलट या नाट्यात आणखी रंग भरण्याचे काम होताना दिसत आहे. शिवसेनेत बंडाळी घडवून महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची हेच या नाट्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार त्यातील पात्रांनी आपापली भूमिका वठवली. सुरत, गुवाहाटी, सर्वोच्च न्यायालय, गोवा, राजभवन आणि सर्वात शेवटी मंत्रालय अशा ठिकाणी त्याचे वेगवेगळे प्रयोग सादर झाले. मात्र सर्वात धक्कादायक असा क्लायमॅक्स झाला तो गुरुवारी संध्याकाळी राजभवनात या नाटकाचा शेवटचा वगैरे वाटणारा प्रयोग झाला तेव्हा. उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. पक्षादेश म्हणून ते त्यांनी स्वीकारलेही. या 'क्लायमॅक्स'वर टीका, समीक्षण, परीक्षण असा भडिमार होत असताना 'मोठे मन' आणि 'पक्षनिष्ठेचे पालन' असा एक बचाव समोर आला. ''फडणवीस यांनी मन मोठे करून मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले'', असा युक्तिवाद आता केला जात आहे, असा टोला सामनात लगावला आहे. 


लेखामध्ये पुढं म्हटलंय की, वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे. काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच 'छोटे मन' आणि 'मोठे मन' यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे 'मोठे मन' भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून 'मोठ्या मना'ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती. लोकशाहीचे वस्त्रहरण करून घडविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या राजकीय नाट्याचे आणखी किती अंक समोर येणार हे आता बघावे लागेल. जे झाले ते झाले, पण महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आणि पक्षादेश शिरोधार्य मानणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून महाराष्ट्रहिताचेच कार्य घडो हीच अपेक्षा आहे! हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळा धृतराष्ट्र नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असंही लेखात म्हटलं आहे. 


'मन' आणि 'अपराध' यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे. काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच 'छोटे मन' आणि 'मोठे मन' यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे 'मोठे मन' भाजपने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून 'मोठ्या मना'ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती, असं अग्रलेखात म्हटलं आहे.