मुंबई : येणारं वर्ष म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम असणार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष स्वबळाचा नारा देतोय आणि ताकद आजमवतोय. पण सत्तेत मुख्यमंत्री आणि महापौरपदाचा मुकुट स्वत:कडे ठेवणारा शिवसेना पक्ष तयारीलाही लागलाय. काय आहे शिवसेनेचं मिशन 2022 पाहुयात.
2019 च्या निवडणुकांनतर राज्यात शिवसेना भाजपपासून दूर झाली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. 2019 ची घटना भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. त्यामुळे भाजपनं मुंबई महानगरपालिकेत यंदा महापौर पदावर निशाणा लावलाय. राज्यातला बदल झाल्यानंतर वर्षानुवर्ष मुंबई महानगरापालिकेवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेला दणका देण्यासाठी भाजपसोबत, मनसे, काँग्रेसही सज्ज झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत तयारी सुरु केली आहे.
शिवसेनेची शाखा हा शिवसेनेचा जीव मानला जातो. याच शाखेतून सैनिक प्राणावायू घेतो आणि तयारीला लागतो. त्यामुळे निवडणुकांची तयारी ही शाखेतूनच केली जाते. सैनिकांना चार्ज करून, आढावा घेण्याचं काम सध्या आतून सुरु आहे.
शिवसेनेचं मिशन 2022 कसं आहे ?
शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेसाठी टीम्स तयार केल्या आहेत. शिवसेनेतले आमदार, खासदारांमध्ये निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे निरीक्षक शाखां-शाखांमध्ये जाऊन आढावा घेत आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची युवासेना शाखा शाखा पिंजून काढतेय. युवा सेनेतले पदाधिकारी शाखेतल्या युवा टीम मजबूत करत आहेत. महिला आणि युवा मुलींची टीम शाखेतल्या महिलांचा सहभाग वाढवत आहेत.
दुसरकीडे मराठी कार्ड वापरणारी मनसेही स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे शिवसेनेची टक्कर भाजपसोबत मनसेशीही असणार आहे. पुण्यात राज ठाकरेंनी मुंबईत स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय. तर भाजपनंही आपण सज्ज असल्याचं सांगितलंय. त्यामुळे मुंबई महानगरपालिका राखण्यासाठी दोन तगड्या विरोधकांचा सामना शिवसेनेला करायचा आहे.
सध्या काँग्रेस सत्तेतला भागीदार आहे पण मुंबई महानगरपालिकेत तोही शिवसेनेच्या विरोधात उभा ठाकणार आहे. त्यामुळे शिवसेनेला राज्यात मांडीला मांडी लावून काम करत असलेल्या काँग्रेसला शिंगावर घ्यावं लागणार आहे. सध्या मुख्यमंत्री आणि महापौर पद हे शिवसेनेकडे आहे, पुढील काही महिन्यात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना ही दोन्ही पदं स्वत: कडे राहावी यासाठी आतापासूनच प्रयत्न करत आहे, त्यासाठी शिवसेनेने आपलं मिशन 2022 सुरु केलंय.