Shiv Sena MP Sanjay Raut PC : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलंय असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. त्याच निमित्तानं संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कधीही भोंग्यांची गरज लागली नाही, असेही खडे बोल संजय राऊतांनी राज ठाकरेंना सुनावले आहेत. 


शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी कोणालाही सोडलं नाही. कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सत्तापरिवर्तन केलं. ही कुंचल्याची ताकद आहे. म्हणून आजही आम्ही व्यंगचित्राच्या कुंचल्यापुढे नतमस्तक होतो. बाळासाहेबांप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार या देशात पुन्हा निर्माण व्हावा. तसेच, देशात सध्या जे काही चाललेलं आहे. एकाधिकारशाही, मनमानी यावर आसूड ओढावे, अशी आम्ही प्रार्थना करतो. ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असं आम्हाला वाटायचं, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलं आहे." 


"भोंग्यांच्या राजकारणामुळे कालपासून 24 तासांत लाखो हिंदूंनी नाराजी व्यक्त केलीये आमच्याकडे. शिर्डी, त्रंवकेश्वर यांसारख्या अनेक तिर्थस्थळांवर काकड आरती होऊ शकली नाही. त्यामुळे असंख्य भाविक नाराज झाले आहेत. तुम्ही मशिदीवरील भोंग्याचं राजकारण सुरु केलं आणि ते हिंदूंच्या गळ्यापर्यंत आलं आहे", असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी आधी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले. त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेबांची कला पुढे जाईल असं वाटलं होतं, पण भाजपनं त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण झालंय.", असं राऊत म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले आहेत की, "आज जागतिक व्यंगचित्रकार दिवस आहे. जगात नेहमीच या कलेला मान्यता मिळाली आहे. जेव्हा माध्यमं, सोशल मीडिया नव्हतं. त्यावेळी एडिटर्स आणि कार्टुनिस्टची ताकद राजाकारणात आणि समाजात मोठी होती. बाळासाहेब ठाकरे एक प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. मला ते नेहमी सांगायचे की, शंभर अग्रलेखांमध्ये जी ताकद नसते, ती एका व्यंगचित्रात असते. एक व्यंगचित्र मोठमोठ्या हुकूमशाहांना नष्ट करते. बाळासाहेबांनी आपल्या कुंचल्यानं मोठमोठ्या कूप्रवृत्त्यांना धडा शिकवला. त्यांची भूमिका नेहमीच राष्ट्रहिताची होती. त्यांनी कुंचल्याच्या मदतीनं मोठमोठी आंदोलनं उभी केली. पण आज, दुर्दैवानं आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर व्यंगचित्रकार म्हणून आता या क्षेत्रात कोणतंच मोठं नाव मला दिसत नाहीये." पुढे बोलताना ते म्हणाले की, "काही व्यक्ती आहे. पण बाळासाहेबांची उंची कोणीही गाठू शकत नाही. काही लोकांमध्ये ती कला होती, पण भाजपनं त्यांचे हात कलम केले आहेत."