Loudspeaker Controversy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. राज्यभरात राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर या मुद्द्यावरुन तणाव वाढला आहे. असं असताना काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी एक मोठा दावा केला आहे. मनसेमुळं हिंदुंचे अधिक नुकसान झालं असल्याचं सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.  


सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मनसेचे अज्ञान किती? हे स्पष्ट दिसते. मुंबई पोलीस अॅक्ट 38 (1) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्‍याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही, असं सावंत यांनी म्हटलं आहे. 






सावंत यांनी म्हटलं आहे की, आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले वा रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. पहाटेची अजान स्वतः मुस्लिम समाजाने बंद केली आहे. पण आता काकड आरतीही बंद झाली. वस्तुस्थिती ही की मनसेमुळे हिंदूचे अधिक नुकसान झाले आहे. मुंबईत एकूण 2404 मंदिरे व 1144 मस्जिद आहेत. कालपर्यंत केवळ 20 मंदिराकडे परवानगी आहे. तर 922 मस्जिदींकडे परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मस्जिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे ऐकलं तर २४०० मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा,बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. 






सचिन सावंत ट्वीटमध्ये म्हणतात, पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे.भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? याचे कारण स्पष्ट आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. 


राजकीय स्वार्थापोटी मनसेची भूमिका व बौध्दिक दिवाळखोरीतून आलेला हा अविचार योग्य का अयोग्य जनतेने ठरवावा. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेच्या मागणीला निकराचा विरोध केला आहे. लाऊडस्पिकरचा मुद्दा हा राजकीय नसून सामाजिक आहे हे राज ठाकरे म्हणत असले तरी त्याला राजकीय किनार आहे हे लपून राहिलेले नाही. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला निशाणा बनवण्याच्या नादात मनसे व भाजपा दोघेही उघडे पडले असून राजकीय फायद्यासाठी सुरु केलेल्या या ‘भोंगे बंद’ मुळे हिंदू समाजाचे मोठे नुकसान होत आहे याचे त्यांना भान राहिले नाही असेही सावंत म्हणाले. देशातील भाजपा शासित राज्यांनी भोंग्यांबाबत बोटचेपी भूमिका घेतली यांचे कारण स्पष्ट आहे. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात भाजपा व त्यांचे साथीदार महाराष्ट्राला बदनाम करत आहेत हे दुर्दैव आहे, अशी चिंता सावंत यांनी व्यक्त केली.


इतर संबंधित बातम्या


Shirdi : शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना; सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी 


Hanuman Chalisa Loudspeaker Row LIVE : भोंग्यांवरुन सुरु असलेला गोंधळ सुरुच; प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...