Shiv Sena MP Sanjay Raut : आपल्या शाब्दिक प्रहाराने विरोधकांना घायाळ करणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. देशभरात सध्या दिवाळीचा सण उत्सवात साजरा करण्यात येतोय. जामीन फेटाळाल्यामुळे दोन नोव्हेंबरपर्यंत संजय राऊत यांना तुरुंगातच राहावं लागणार आहे. संजय राऊत यांनी आर्थर रोड तुरुंगात दिवाळी साजरी केली. त्यांनी तुरुंगात दिवाळी कशी साजरी केली? याची चर्चा मुंबईसह सोशल मीडियावरवर सुरु आहे. प्रत्येक दिवाळीला संजय राऊत शिवसेना नेते कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या भेटीगाठीत व्यस्त असायचं. पण यावेळी त्यांनी तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणे दिवाळी साजरी केली आहे.
इतर कैद्यांप्रमाणेच संजय राऊत यांनी तुरुंगातील कँटिंगमधून दिवाळी फराळ विकत घेतला. कारागृह अधिकारी कँटिंगमध्ये फराळ ठेवतात आणि कोणत्याही कैद्यांना गरज भासल्यास दिला जातो. कैद्यांना तुरुंगातून फराळ विकत घ्यावा लागतो. इतर कैद्यांप्रमाणे संजय राऊत यांनी कँटिंगमधून फराळ विकत घेत खाल्ला. दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर कारागृह प्रशासनाकडून कैद्यांसाठी खास जेवण दिलं जाते. याचाही अस्वाद संजय राऊत यांनी घेतला. रोजच्या जेवणापेक्षा तुरुंग प्रशासनाने कैद्यांना खास डिश दिली होती. सण साजरा करण्यासाठी व्हेज पुलाव, मिक्स व्हेज भजी आणि डाळ तडका याचा जेवणात समावेश होता. कैद्याने हा जेवणाचा आनंद घेत दिवाळी साजरी केली. संजय राऊत यांनाही इतर कैद्यांप्रमाणे तुरुंगात दिवाळी साजरी केली.
दोन नोव्हेंबरला कोठडी संपणार -
खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 21 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. कोर्टानं संजय राऊत यांचा जामीन फेटाळत 13 दिवसांनी कोठडी वाढवली होती. आता दोन नोव्हेंबर रोजी राऊत यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांना जामीन मिळतो की तुरुंगातील मुक्काम वाढतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संजय राऊत जेलमध्ये दिवसभर करतात काय?
संजय राऊत यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना सुरक्षितेच्या कारणास्तव इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राऊत सध्या स्वतंत्र बराकीत आहेत. संजय राऊत हे तुरुंगातील ग्रंथालयाचा वापर करत आहेत. ग्रंथालयातील वर्तमानपत्र, पुस्तके वाचण्यात आपला वेळ घालवत आहेत. याशिवाय टीव्हीवर बहुतांश वेळ ते बातम्या पाहण्यात ते व्यस्त असतात. पत्रकार म्हणून लिहिण्याचा छंद असल्याने त्यांच्या मागणीनुसार त्यांना वही आणि पेनही पुरवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत हे दिवसभरातील बराच वेळ लिखाणात व्यस्त असतात.
संजय राऊतांवर आरोप नेमके काय?
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे.