मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली. सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळीच संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या निमित्ताने विरोधक सध्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. सोबतच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर म्हणाले की, "विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप केले तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की, हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही."
पाहा व्हिडीओ : शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत काय म्हणाले?
विरोधक उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत असून त्यासंबंधी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरु आहे, ते राजीनामा मागण्यासारखंच आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही. महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही. आरोप करु देत त्याच्याने काही होत नाही."
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर कालपासून शरद पवार यांच्यासोबत भेटीगाठींचा सिलसिला सुरु आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही शरद पवार यांच्यासोबत काल बैठक पार पडली. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तसेच ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही चौकशीसाठी दुसऱ्यांदा हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. त्यामुळे या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शरद पवार भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.