Raj Thackeray Prediction : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली. काल (31 जुलै) दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 11:30 वाजता यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली.
दरम्यान संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तीन ते चार महिन्यांपूर्वीची वक्तव्ये चर्चेत आहेत. या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज ठाकरेंनी केलेलं भाकित खरं ठरल्याची चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांचं भाकित खरं ठरलं!
12 मार्च 2022 रोजी पत्रकारांनी राज ठाकरेंना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. 'आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही', असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर 'आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी,' असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं.
तर 12 एप्रिल 2022 रोजी एका जाहीर सभेत टीका करताना राज ठाकरे म्हणाले होते की, "आज पवारसाहेब संजय राऊंतवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही."
त्यानंतर 31 जुलै 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सकाळी सात वाजताच संजय राऊत यांच्या भांडुपमधील निवासस्थानी छापे टाकले. जवळपास नऊ तासांच्या छापा आणि चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. राऊत यांना ईडी कार्यालयात नेऊन पुन्हा चौकशी केली आणि रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना अटक केली.
संजय राऊत यांच्या अकटेनंतर राज ठाकरे यांच्या जुनी वक्तव्ये पुन्हा चर्चेत आली असून त्यांचं भाकित खरं ठरल्याचं बोललं जात आहे. या वक्तव्यांवरुन संजय राऊत यांच्या अटकेबाबत राज यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले होते की काय अशीही चर्चा रंगली आहे.