मुंबई : अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स उद्योगसमूहाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. खोटे आणि तथ्यहीन आरोप केल्याप्रकरणी रिलायन्सने निरुपम यांच्याविरोधात एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.


रिलायन्सकडून मुंबई उच्च न्यायालयात संजय निरुपम यांच्याविरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर 72 तासांच्या आत निरुपम यांनी माफी मागावी, असं नोटीशीत म्हटलं आहे.

मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपनीचं बाजारमूल्य पाच हजार 775 कोटी रुपये असताना अदानी उद्योग समूहातील अदानी ट्रान्समिशन कंपनीने 18 हजार 800 कोटींना विकत घेतल्याचा आरोप संजय निरुपम यांनी मंगळवारी केला होता.

पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार हा व्यवहार झाल्याचा दावाही संजय निरुपम यांनी केला होता. याचा संबंध विनाकारण फ्रान्स सरकारकडून झालेल्या राफेल विमान खरेदीशी जोडल्याचंही रिलायन्सने म्हटलं आहे. निरुपम यांचे सर्व आरोप खोटे, निरर्थक आणि तथ्यहीन असल्याचं रिलायन्सने सांगितलं.

जनतेसाठी असे मुद्दे नेहमी समोर आणणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे. एखाद्या व्यवहारात पारदर्शकतेची मागणी करणं म्हणजे मानहानी करणं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.