Kishori Pednekar : झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात (SRA) सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते व त्यांची चौकशी करण्यात आली होती. यांनतर आज पुन्हा एकदा दादर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांची अडीच तास चौकशी झाली. किशोरी पेडणेकर यांची एकीकडे चौकशी होत असताना दुसरीकडे भाजप नेते किरीट समय्या यांच्या आरोपाची मालिका सुरुच आहे. 


शिवसेनेत संजय राऊत यांच्यानंतर गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर यांची तोफ भाजप आणि शिंदे गटााविरोधात धडाताना पाहायला मिळत होती. मात्र पेडणेकर यांना हळूहळू थंड करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात  सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी जून महिन्यात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक आरोपीमध्ये संजय लोखंडे यांच्याशी किशोरी पेडणेकर यांचे व्हाट्सअप चॅटिंग सापडले होते. त्यामुळे पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज त्या चौकशीसाठी सव्वा अकरा वाजता हजर राहिल्या होत्या. 


 दादर पोलीस स्टेशनमध्ये  किशोरी पेडणेकर यांची  पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. एस आर ए घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संजय लोखंडे यांनी पेडणेकरांची केलेल्या व्हाट्सअपचॅट संदर्भात त्यांची चौकशी झाली. अनेक अँगलने पेडणेकर यांची चौकशी या अधिकाऱ्यांनी केली, मात्र आजपर्यंत झालेल्या चौकशीमध्ये पेडणेकर आणि लोखंडे यांचे एस आर ए प्रकरणांमध्ये काही संबंध आहेत, असे पुरावे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र पुढे देखील चौकशी पेडणेकर यांची होईल का? यासंदर्भात पोलिसांनी मौन बाळगले आहे. मात्र मी चौकशीला  सामोरे जाईन असे पेडणकेर यांचं ठाम मत आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचा पेडणेकर यांनी सांगितले.


एकीकडे किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे लोअर परेल येथील एसआरए गोमाता को-ऑपरेटिव्ह सोसायटीत  भाजप नेते किरीट सोमय्या पोहचले होते. यावेळी त्यांनी  पेडणेकर यांच्यावर वेगळे आरोप केले. दादर येथे एस आर ए प्रकरणात जो गुन्हा नोंदवलाय ,त्या आरोपींमध्ये असलेल्या चंद्रकांत चव्हाण यांच्याशी थेट संबंध सोमय्या यांनी पेडणेकरांचा जोडला.  दादर पोलीस ठाण्यातील एस आर ए प्रकरणात किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये किरीट सोमय्या वेगळे वेगळे आरोप करत सुटले आहेत. दादर पोलीस एस आर या प्रकरणाचा तपास करत आहेत, त्याचा तपास कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही. मात्र होणारे आरोप आणि तपास यामधे किशोरी पेडणेकर यांचा सहभाग खरच आहे का हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र नसेल तर पेडणेकर यांची तोफ थंड करण्याचा प्रयत्न आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे अशी चर्चा सुरू आहे.