मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वापरासाठी 30 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत वाढवावी, अशी मागणी शिवसेनेने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आवश्यक बिलासोबत पब्लिक ट्रान्सपोर्ट, मिल्क बूथ, को-ऑपरेटिव्ह स्टोअर इत्यादी ठिकाणी या नोटांचा वापर करु देण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.

नोटा बंद करण्याचा मोदींचा निर्णय

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिंसेंबरची मुदत दिली आहे.

बँकांबाहेर लोकांच्या रांगा

नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी केली. शिवाय, सामान्यांचा दैनंदिन जीवनक्रमही बिघडला. अनेकांना रोजच्या वस्तू खरेदी करणंही अवघड झालं. त्यामुळे लोकांचा व्यवहार सुरळीत व्हावा यासाठी शिवसेनेने जुन्या नोटा वापरण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे.

उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटा बंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काल टीका केली होती. “मोदींनी स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करावं.”, असे म्हणत उद्धव यांनी मोदींवर निशाणा साधला होता. शिवाय, “नोदा बंदीच्या निर्णयाला विरोध नाही. मात्र, लोकांना वेळ देण्याची गरज होती.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.