कल्याण : राज्यात शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्ता काबिज केली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकामी चित्र काहीसं वेगळं आहे. कारण शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत, तर कल्याणच्या मानिवली ग्रामपंचायतीत दोन्ही पक्ष युती करुन सत्तेवर आले आहेत. मानिवली गावच्या सरपंचपदी भाजपच्या माया गायकर तर उपसरपंचपदी शिवसेनेचे चंद्रकांत गायकर आले आहेत.


कल्याण तालुक्यातील उर्वरीत दहा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पाडली. सरपंच कोणत्या पक्षाचा होणार यासाठी सर्व पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. कल्याण तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये सत्तेसाठी शिवसेना भाजप एकत्र आल्याचं दिसून आलं. 9 सदस्य असलेल्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये तीन शिवसेनेचे, तीन भाजपचे आणि तीन इतर निवडून आले होते.


सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप एकत्रित आले. सरपंचपदी भाजपच्या माया गायकर या बिनविरोध निवडून आल्या. शिवसेनेचे चंद्रकांत गायकर हे उपसरपंचपदी निवडून आले. यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर भाजपने पुढाकार घेतल्याने युती केल्याचं उपसरपंच गायकर यांनी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर एकमेकांवर आगपाखड करणारे शिवसेना भाजप दोन्हीं पक्ष सत्तेसाठी ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.