मुंबई : पोलिस अधिकारी  सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे , हे आश्चर्यच आहे, असं सामनात म्हटलं आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली , याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, असंही लेखात म्हटलं आहे.


आणि अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा 'स्फोट' झाला!
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, मुंबई पोलीस दलातील एक तपास अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीत जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. त्यामुळे खळबळ माजली. अंबानींचे नाव आल्यामुळे हे सर्व प्रकरण पोलिसांनी फारच मनावर घेतले. हे सर्व का झाले, कसे झाले यावर चर्चा सुरू झाल्या, पण काही दिवसांतच या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्याने अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा 'स्फोट' झाला आहे, असं लेखात म्हटलंय. 


Exclusive : ...म्हणून सचिन वाझेंना अटक, इनोव्हाच्या नंबर प्लेटचा झोल? CCTVमधून महत्वाची माहिती 


भाजपवाल्यांचा महंत अर्णब गोस्वामीला बेड्या ठोकल्या अन्...
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, वाझे यांच्या अटकेने भारतीय जनता पक्षात जे आनंदाचे भरते आले आहे त्याचे वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडावेत. ''वाझे यांना अटक झाली हो।।'' असे गर्जत हे लोक रस्त्यावर यायचेच काय ते बाकी आहेत. या आनंदाचे कारण असे की, काही महिन्यांपूर्वी याच वाझे यांनी रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपवाल्यांचा महंत अर्णब गोस्वामी यास अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. त्या वेळी हे सर्व लोक गोस्वामी याच्या नावाने रडत होते व वाझे यांना शाप देत होते. ''थांबा, बघून घेऊ, केंद्रात आमचीच सत्ता आहे'', असे सांगत होते. तो मोका आता साधला असून 20 जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात वाझे यांना केंद्रीय पथकाने अटक केली आहे, असं लेखात म्हटलं आहे. 


महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात


सामनात म्हटलं आहे की, महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, या केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात धाव घेतात. अलीकडे हे जणू केंद्र सरकारचे धोरणच झालेले दिसते. अंबानी हे आपल्या देशातील बडे प्रस्थ आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असता कामाच नये. म्हणूनच त्यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या 20 जिलेटिनच्या कांड्या व त्यानंतर झालेला मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन्ही प्रकार गंभीरच आहेत, पण म्हणून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही हे केंद्र सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते? मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपींना फासावर लटकविणारे जसे मुंबईचे पोलीस आहेत तसे '26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबसारख्यांना प्राणाची बाजी लावून पकडणारे व फासावर लटकवणारेही मुंबई-महाराष्ट्राचेच पोलीस दल आहे, असं लेखात म्हटलं आहे.