Deepali Sayyad :शिवसेना आणि भाजप नेते-कार्यकर्त्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अमृता फडणवीस यांनी भोंग्याच्या वादावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांना नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे स्वप्न च राहील दिपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले. आता दिपाली सय्यद यांच्या वक्तव्यावरून नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.
कल्याणात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकातून न्यू कामगार संघटनेच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन दिपाली सययद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत बोलताना दिपाली सय्यद यांनी म्हटले की, फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. नाहीतर पुन्हा येईन पुन्हा येईन हे कायम स्वप्न राहील. शिवसेना ऐकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
राज ठाकरेंना चिमटा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा असून या सभेला कोणीतरी विजयी भव असा आशीर्वाद दिला आहे. आजवर त्यांना कुठेही विजय मिळालेला नसून आतातरी विजय मिळू देत असे म्हणत दिपाली सय्यद यांना चिमटा काढला.
दंगलीने समाजमन दुभंगणार
सध्या सुरू भोंग्याच्या वादावरून समाजात वाढत असलेल्या तणावावर दिपाली सय्यद यांनी भाष्य केले. या वादामुळेमुळे काही हिंदू राज ठाकरे यांच्यासोबत तर मुस्लिम ओवेसी यांच्यासोबत जातील. मात्र, तळागाळातील सर्वसामान्य लोक आपसात भांडत बसतील आणि त्यातून दंगली उसळतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या दंगलीत, तणावामध्ये सर्व संपून जाईल अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली.