मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिथे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ते धर्मनिरपेक्ष आहेत असं तेव्हा वाटत होतं, आता वाटत नाहीत”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला.

पवार धर्मनिरपेक्ष आहेत पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्याला पवारांनी उत्तर दिलं.

याशिवाय पवारांनी एका निवडणुकीची आठवणही सांगितली.

“मला साल आठवत नाही, पण ईशान्य मुंबईत आम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकरांच्या पक्षाने नीलम गोऱ्हेंना उभं केलं होतं. त्याचा लाभ प्रमोद महाजन यांना झाला होता. महाजन तेव्हा भाजपात होते. तेव्हा भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना कोण धर्मनिरपेक्ष आहे आणि कोण नाही हे सांगतात", असा हल्ला पवारांनी चढवला.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. संभाजी भिडेंची पिल्लावळ राष्ट्रवादीत आहेत. उदयनराजे भिडेंची बाजू मांडतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास आम्हाला अडचण आहे. आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत, पण त्यांच्या मित्रांसोबत नाही, असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

पवारांचा मोहन भागवतांवर निशाणा

दरम्यान आज पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला.

रामायण असो की महाभारत याची देशाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे सगळे या देशाचे घटक आहेत. मला जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार त्यांना आहे. ते देशाचे तेवढेच हिस्सेदार आहेत. आणि ते देशाचे हिस्सेदार आहेत हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नमूद केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांशिवाय हिंदुत्व अपुरं आहे, असं म्हटलं होतं. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

पवार म्हणाले, मुस्लिम, ख्रिश्चन हे सगळे या देशाचे घटक आहेत. ते जन्मातच या देशाचे नागरिक आणि हिस्सेदार आहेत.

संबंधित बातम्या 

पवार धर्मनिरपेक्ष, त्यांचा पक्ष नाही; राष्ट्रवादीत भिडेंची पिल्लावळ : आंबेडकर  

'भविष्य का भारत' चर्चासत्रात सरसंघचालकांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी 

‘बंच ऑफ थॉट्स’चे विचार तत्कालीन, आता संयुक्तिक नाहीत : भागवत 

मुंबई | प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न | जयंत पाटील  

आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे भाजपला मदत करतील : सामना