मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान भाषण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली. या भेटीचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केले आहे. राहुल गांधींच्या मनात कुठलाही आकस नाही, त्यामुळे त्यांनी गळाभेट घेतली, असे पवार म्हणाले. ते आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या अविश्वास प्रस्तावादरम्यानच्या भाषणाचंही कौतुक केलं. भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी सर्व प्रश्न उत्तमपणे उपस्थित केले. त्यांनी विचारलेले सर्व प्रश्न महत्वाचे होते, असेही पवार म्हणाले.

“तुम्ही सांगितलं, आम्ही भ्रष्टाचार संपवतो, संपवा. तुम्ही सांगितलं, परदेशातून आम्ही काळा पैसा परत आणतो, आणा. तुम्ही सांगितलं की गरीब माणसाच्या खात्यात पैसे भरतो, भरा. आम्ही काहीच म्हणत नाही. जे जे शब्द तुम्ही दिलेत, ते ते पूर्ण करा आणि त्यांची पूर्तता केल्यानंतर आमचा त्याला विरोध नाही.”, असे शरद पवार म्हणाले.

तसेच, मोदींच्या सामाजिक धोरणासंबंधी, आर्थिक धोरणांसंबंधीत आमचे काही मतभेद आहेत.  पण याचा अर्थ व्यक्तिगत आकस आमच्या मनात नाही. आणि म्हणून त्यांनी काल जे सांगितलं, त्याची काही लोकांनी टिंगल केली. पण काँग्रेसच्या अध्यक्षांनी काल त्यांना सांगितलं की, तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा काही म्हणा पण माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात आकस नाही. हा एक संदेश जो आहे, एका लहान माणसाने देशाच्या प्रमुखाला दिलाय. हे आपल्याला मान्य करावं लागेल.”, असेही पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

विधानसभेआधी शिवसेनेचा भडका उडणार : अजित पवार

आरक्षण संपवण्याचा डाव, तो हाणून पाडा : भुजबळ