ठाणे : महापौरांनी सभागृहात बोलू न दिल्याने ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे चार नगरसेवक नाराज झाले आहेत. शिवसेनेत येऊन आपण पस्तावलो असल्याचे नाराज नगरसेवक देवराम भोईर यांनी म्हटले आहे.


नेमकं काय घडलं?

ठाणे महापालिकेच्या महासभेत आज सलग दुसऱ्या दिवशी वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर हे शिक्षण मंडळाच्या विषयावरून बोलायला उभे राहिले असता 'तुम्हाला काही माहित नाही, तुम्ही गप्प बसा' असं म्हणत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना टाळलं. त्यामुळे कमालीच्या नाराज झालेल्या देवराम भोईर यांच्यासह त्यांचे सुपुत्र नगरसेवक संजय भोईर, नगरसेवक सून उषा भोईर आणि पुतण्या नगरसेवक भूषण भोईर यांनी सभात्याग केला.

ज्येष्ठ नगरसेवक असूनही महापौरांनी आपला अपमान केल्याची देवराम भोईर यांची भावना असून याबाबत तक्रार करण्यासाठी देवराम भोईर यांच्यासह त्यांच्या परिवारातील चारही नगरसेवक मातोश्रीवर निघाले आहेत.

याच महासभेत काल पहिल्या दिवशी स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादीने महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही स्वपक्षीय नगरसेवकांच्याच नाराजीला महापौरांना सामोरं जावं लागलं आहे.

देवराम भोईर हे ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता.

सेनेत येऊन पस्तावलो

सभागृहातल्या वादावेळी भोईर परिवारातील या नगरसेवकांचा सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याशीही वाद झाला. यावेळी आपण शिवसेनेत प्रवेश करून पस्तावलो असल्याचं वक्तव्य करत मातोश्रीवर जाऊन राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य देवराम भोईर यांनी केलं.

थेट एकनाथ शिंदेंना शह?

महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भोईर परिवाराने या वादानंतर थेट एकनाथ शिंदेंना शह देण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय.