मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार बनण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ठेवला होता. मात्र शरद पवार यांनी हा प्रस्ताव धुडकावला आहे.

पत्रकारांशी बातचीत करताना नवाब मलिक यांनी दावा केला आहे की, "हा प्रस्ताव स्वत: सोनिया गांधींनी शरद पवारांसमोर ठेवला होता, जो पवारांनी फेटाळला. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार नाही, असंच शरद पवार कायम सांगत आले आहेत."

"राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे की, यूपीएच्या सर्व घटकपक्षांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक संयुक्त उमेदवार द्यावा," असं नवाब मलिक म्हणाले. शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी घ्यावी, अशी यूपीएच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले होते की, "एनडीएकडे राष्ट्रपदीपदासाठी स्वत:चे उमेदवार जिंकवण्यासाठी आवश्यक बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाही."

दुसरीकडे, यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी संयुक्त उमेदवार देण्याबाबत बातचीत सुरु आहे. यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. यानंतर ममतांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. दोघांमध्ये विविध मुद्द्यांसह राष्ट्रपती निवडणुकीचीही चर्चा झाली.