कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक संदीप तिवारी यांच्यावर विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लगेज माफियांनी हल्ला केला. संदीप तिवारी असं या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून रेल्वेमध्ये
बेकायदेशीरपणे सामान चढवण्याला विरोध केल्याने हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

रेल्वेतून जाणाऱ्या लगेजबाबत तिवारी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात विठ्ठलवाडी स्थानकात सामानाची तपासणी करत तिवारी यांनी बेकायदेशीर लगेजविरोधात कारवाई सुरु केली. त्याचा राग आल्याने तिथे असणाऱ्या मुसा नामक व्यक्तीने बिअरच्या बाटलीच्या काचेच्या साहाय्याने आपल्यावर वार केल्याचा दावाही तिवारी यांनी केला आहे.

सुदैवाने हा वार आपण हातावर झेलल्याने केवळ हातालाच दुखापत झाल्याचं तिवारींनी सांगितले. कल्याण स्थानकामधील एका टीसीच्या समोर हा हल्ला करण्यात आला. तिवारी यांना कल्याण रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यापूर्वी ठाण्याचे वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता यांच्यावर कोपर रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे हल्ला झाला होता.