मुंबई: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचं सोमवारी रात्री 9.30  निधन झालं. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. किशोरीताईंच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.


‘किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विशुद्ध सूर हरपला. किशोरीताईंच्या सुरांचा मी स्वतः एक निःसीम चाहता, त्यामुळे किशोरीताईंच्या जाण्याने संगीत रसिकांना झालेल्या दुःखाची व भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीची कल्पना येऊ शकते.’ अशा शब्दात शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


‘किशोरीताईंच्या आई ख्यातनाम गायिका मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडून जयपूर घराण्याचा वारसा जरी त्यांना लाभला तरी घराण्यात अडकून न राहता किशोरीताईंनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायकी समृद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग केले. अखंड अभ्यास, त्याला प्रगल्भ विचारांची जोड आणि परिश्रमपूर्वक केलेला संगीताचा कठोर रियाज यामुळे किशोरी आमोणकर या गायिकेचे गारुड रसिकांवर झाले ते कायमचेच.’

‘शास्त्रीय संगीतातील रसनिर्मिती आणि भावनाप्रधानता याला किशोरीताईंनी महत्त्व दिले. त्याकरिता सतत मनन, चिंतन करून प्रयोग केले. उपशास्त्रीय गायकीला सन्मान मिळवून दिला. केवळ गायकीपुरतंच मर्यादित न राहता ग्रंथनिर्मिती केली. अनेक सकस शिष्य घडवले. अलौकिक जादूभऱ्या आवाजाच्या साधक असलेल्या किशोरीताईंना मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने मनःपूर्वक श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहवेदना व्यक्त करतो.’ असं म्हणत शरद पवारांनी किशोरीताईंना श्रद्धांजली वाहिली.