मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) ठाकरेंच्या सेनेसोबतची चर्चा थांबवल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने मागितलेल्या जागांवर अपेक्षित प्रतिक्रिया आली नसल्याने त्यांनी ही चर्चा थांबवल्याची माहिती आहे. पवारांची राष्ट्रवादी आता काँग्रेसच्या (Mumbai Congress) निर्णयाची वाट पाहणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याची माहिती आहे. जिथं घटक पक्षाला आदर दिला जात नाही तिथ युती करणे योग्य नाही असा मतप्रवाह पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे आपण आपला वेगळा निर्णय घ्यावा असा बैठकीत निर्णय झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काँग्रेस सोबत 58 जागांबाबत बोलणी सुरू आहे. गुरुवारी सकाळपर्यंत काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
Sharad Pawar NCP Mumbai : ठाकरेंसोबत चर्चा थांबवली
मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ही ठाकरे बंधूंसोबत जाण्यास उत्सुक होती. राष्ट्रवादीची मुंबईत 50 जागांची मागणी असल्याची माहिती होती. परंतु त्यावर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत 10 पेक्षा जास्त जागा सोडण्यास ठाकरे बंधू तयार नसल्याची माहिती आहे.
त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंसोबत युतीची चर्चा थांबवल्याची माहिती आहे. पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत 50 जागांवर लढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची चर्चा सुरू असताना पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी शिष्टमंडळासह काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी ही काँग्रेस सोबत जाण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे.
काँग्रेससमोर पवारांच्या राष्ट्रवादीने 58 जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे गुरुवारी स्पष्ट होईल. गुरुवार सकाळपर्यंत काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहण्याची भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे. जर काँग्रेसचा काही निर्णय आला नाही तर पवारांची राष्ट्रवादी त्यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही बातमी वाचा: