नाशिक : एकीकडे ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर दुसरीकडे नाशिकमधील महायुतीचा जागावाटपाचा पेच संपल्याची माहिती आहे. नाशिक महापालिकेमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार असून शिंदेंच्या शिवसेनेसमोर 25 ते 30 जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. भाजपचा हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य असल्याचीही माहिती आहे. नाशिक महापालिकेमध्ये 122 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
नाशिक महापालिकेसंदर्भात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक पार पडली. शिंदेंच्या शिवसेनेची आधी 45 जागांची मागणी होती. मात्र, भाजपकडून त्यांना 25 ते 30 दरम्यान जागा सोडण्याचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यावर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच नाशिक पालिकेसंदर्भात सेना-भाजप युतीची घोषणा केली जाणार आहे.
Nashik Election : ठाकरे बंधूंमध्ये जागावाटप निश्चित
नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती झाली असून त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार आहे. महापालिका जागावाटपासंदर्भात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या युती संदर्भात बैठका पार पडल्या असून कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे.
नाशिक महापालिकेच्या 122 जागापैकी 72 ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर 50 जागा मनसेकडे राहण्याची शक्यता आहे. यात माकप, वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी बोलणी सुरू आहे. त्यामुळे या जागा वाटपात मित्र पक्षांना सामावून घेतल्यानंतर त्यांना किती जागा दिल्या जातात, त्यानुसार फॉर्म्युलात बदल होणार आहे. तर त्याचवेळी काँग्रेस आणि मनसे या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्यानं काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.
2017 नाशिक महापालिका ची निवडणूक झाली होती त्यावेळी 122 पैकी 5 जागांवर मनसेचे नगरसेवक जिंकून आले होते. तर 35 जागांवर शिवसेना निवडून आली होती. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना दुभंगली गेली असून सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 8 तर मनसेकडे 3 नगरसेवक आहेत. त्यामुळे मनपा निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान ठाकरे ब्रँडसमोर असणार आहे.
ही बातमी वाचा: