पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अर्धवट सोडून तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
या बैठकीसाठी तीनही सैन्यदलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि दिग्गज मंत्री उपस्थित आहेत.
दरम्यान, भारत आज पाकिस्तानसोबतचा शस्त्रसंधीचा करार मोडणार असल्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2003 साली शस्त्रसंधी करार झाला होता.
काल रात्री सीमेवर पुन्हा गोळीबार झाला. त्यात आमचे दोन जवान मारले गेल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. शस्त्रसंधी करार जर संपुष्टात आला, तर सैन्यदलाला तात्काळ निर्णय घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मुभा मिळेल.