मुंबई : नोटाबंदीनंतर देशाला होणाऱ्या फायद्याचं मोदी सरकारकडून रंगवण्यात येणारं चित्र फसवं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून परिवर्तन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पवारांनी नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली.

“मुंबई महानगरपालिकेत आता परिवर्तन करायचे आहेच. पण देशात आणि राज्यात आज जे चालू आहे ते असेच राहिले तर सामान्य माणसांचे जगणे मुश्किल होईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकातही परिवर्तन करावे लागेल. त्यादृष्टीने ही परिवर्तन रॅली महत्त्वाची आहे.”, असे पवार म्हणाले.

या सभेत शरद पवारांनी मुंबईकरांच्या व्यथांना स्पर्श करत त्यांवरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं. शरद पवार म्हणाले, “मुंबईत आज लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या यातना मी सांगायची गरज नाही. जसा निवाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तसा दळणवळणाचा, लोकलचा प्रश्न महत्त्वाचा आहे.”

मुंबईहून अहमदाबादला जाण्याची घाई!

“दळणवळणाची गाडी धावली पाहिजे. पण मुंबईकरांच्या यातना सरकारला दिसत नाहीत. त्यांना हवीय मुंबई-अहमदाबाद ट्रेन. 98 हजार कोटी खर्च करून त्यांना अहमदाबादला जायची घाई लागली आहे. मुंबई लोकलवर आठ हजार कोटी खर्च केले तर मुंबईकरांचे प्रश्न  सुटतील. 98 हजार कोटी रूपयात मुंबई-दिल्ली, दिल्ली-कलकत्ता, कलकत्ता-चेन्नई या सर्व ठिकाणच्या ट्रेन धावू शकतात. पण त्याकडे मोदी साहेबांचे लक्ष नाही.”, असेही पवार म्हणाले.

“परदेशात जाऊन भारताची बदनामी करु नका

 

“मोदीजी देशाबाहेर जाऊन भारताच्या नेत्यांवर टीका करतात. याचा अर्थ भारताची बदनामी तुम्ही बाहेर जाऊन करतात. इंदिरा गांधीनी असे कधीच केले नाही. पंतप्रधानांनी जगात जावे, भारताचे प्रश्न सोडवावेत आणि भारतीयांचा सन्मान ठेवावा. पण त्यांनी भारताचे प्रतिनिधी बनून जावे. भाजपचे प्रतिनिधी म्हणून जावू नये.”, असा सल्ला यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.