मुंबई : काँग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळली होती म्हणून यांना निवडून दिलं. तेव्हा निर्णय घेताना मोदींनी या 125 कोटी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यामुळे या मनमानी विरोधात लढण्यासाठी तयार राहा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा फटका देशभरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापार जवळपास 70 टक्क्यांनी थंडावला आहे, अशी कैफियत आज व्यापाऱ्य़ांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली.
... तर जन-धन योजना आणलीच कशाला?
सर्वसामान्यांसाठी जन-धन योजना आणण्यात आली. काळा पैसा बाहेर काढून लाखो रुपये या खात्यात जमा करू, असं आश्वासन मोदींनी दिलं. आता जिल्हा बँकांवर बंदी आणली. या बँकांत ज्या शेतकऱ्यांची खाती आहेत, त्यांचे हाल होत आहेत. जी जन-धन खाती आहेत त्यावरही सरकारची नजर आहे. मग ही जन-धन योजना आणलीच कशाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आमचा व्यवसाय चांगला असतो. मात्र या निर्णयाने सर्व व्यवहारच कोलमडून पडला आहे. सरकारने हा निर्णय घेतला, मात्र त्याचा होमवर्क व्यवस्थित केलेला नाही. टॅक्स, व्हॅट, सर्व्हिस टॅक्सचे ओझे असतानाच आता नोटाबंदीमुळे व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे सरकारने व्हॅट आणि इन्कम टॅक्स रद्द करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली.