Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : मुंबई : सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshitsav 2024) धामधूम सुरू आहे. अशातच गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग गजबजून गेलं आहे. लालबागमध्ये (Lalbaug) देश-विदेशातून भाविकांनी गर्दी केली आहे. एवढंच काय तर, अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील गणपती मंडळांमध्ये (Lalbagh Ganapati Mandal) गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. लालबागमधील प्रसिद्ध मंडळांपैकी एक असलेलं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही गणरायाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबाग राजाच्या (Lalbaghcha Raja) चरणी लीन होण्यासाठी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar Party) सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी हजेरी लावली. आपले जावई सदानंद सुळे (Sadanand Sule) आणि नात रेवती सुळे (Revati Sule) यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी पोहोचले. 


थोरले पवार दुसऱ्यांदा लालबाग राजाच्या चरणी लीन झाले आहेत. यापूर्वी ज्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अनेक वर्षांनंतर आज शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत. सोबतच, कोरोना काळात रक्तदान शिबिराचं आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळानं केलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मंडळाच्या वतीनं गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं. 


दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. तसेच, देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनीदेखील सहकुटुंब लालबाग राजाचं दर्शन घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. 


चिंचपोकळी चिंतामणीच्या दर्शनालाही पोहोचले शरद पवार


आज सकाळी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शरद पवारांसोबत त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यादेखील उपस्थित होत्या. 


पाहा व्हिडीओ : Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : शरद पवार, रेवती आणि सदानंद सुळे लालबाग राजाच्या दर्शनाला