मुंबई : अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी केला. "देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच," अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी ईडीच्या कारवाईवर दिली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्याच्या ईडीवरील कारवाईनंतर शालिनीताई सर्वप्रथम एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली.


जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी जप्त करण्यात आली.



उशीर झाला पण न्याय मिळाला... 
या कारवाईवर माजी आमदार शालिनीताई पाटील म्हणाल्या की, "आमच्या कारखान्यावर कर्जाचा हफ्ता केवळ 3 कोटींचा असताना त्यांनी विकला. वास्तविक पाहता आमच्या खात्यात 8 कोटी रुपये होते. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला. त्यांनी 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. परंतु थोडा उशीर झाला पण आम्हाला न्याय मिळाला. आम्ही चार जणांनी अर्ज केला होता. 2019 मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी एफआयआर दाखल करुन ईडीने घेतली होती. त्यांनी मान्य केलं होतं की भ्रष्टाचार झाला होता. मला आनंद आहे 27 हजार सभासदांना न्याय मिळाला आहे. लोकांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला एकदा सोडला तर कधीच निवडणूक कारखान्यात झाली नव्हती.


"कोर्ट माझ्यापाठी पहिल्यापासून लागलं होतं. कारण यांनी माझी कामं कधी होऊ दिली नाहीत. त्यामुळे मला सुप्रीम कोर्टाची मदत घ्यावी लागली होती. मी सत्यमेव जयतेवर विश्वास ठेवते," असं शालिनीताई पाटील म्हणाल्या.


'अचानक गुरु कंपनी प्रकट झाली आणि 63 कोटींना कारखाना खरेदी केला'
आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. विचार करा गुरु कंपनीची प्रॉपर्टी 63 लाख रुपये आणि तरीदेखील त्यांनी कारखाना विकत घेतला. त्यांचे 100 अपराधांचं भांड भरलं आणि त्यांच्यावर कारवाई झाली. ज्यावेळी कारखाना खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी गुरु कंपनी कुठेच नव्हती. ज्या दिवशी कारखाना खरेदी होणार त्यादिवशी अचानक गुरु कंपनी प्रकट झाली आणि त्यांनी 63 कोटीला खरेदी केला. ज्यांची वार्षिक उलाढाल 63 लाख रुपये होती.


राजू शेट्टी यांच्या मागणीवर शालिनीताई काय म्हणाल्या?
एकाच नाहीतर राज्यातील 43 कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यावर शालिनीताई म्हणाल्या की, "राजू शेट्टी यांचं म्हणणं बरोबर आहे. सर्वात पहिला नंबर आमच्या कारखान्याचा होता. आता इतर देखील सुरुवात होईल. 43 पैकी 38 कारखाने राष्ट्रवादीकडे आहेत. कुठून आला पैसा. याविरोधात देखील आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. वकील तळेकर या प्रकरणी कोर्टात लढाई लढत आहेत. लवकरच यांच्यावर देखील कारवाई होईल."