मुंबई : कोरोना व्हायसरचं संकट दिवसेदिवस वाढत चाललं आहे. या संकटात प्रत्येक जण जेवढं जमेल तितकी मदत करताना दिसत आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने आपलं मुंबईतील ऑफिस बीएमसीला वापरायला दिलं आहे. शाहरुखने चार मजली अलिशान ऑफिस बीएमसीला क्वॉरंटाईन सेंटरसाठी दिलं आहे. ऑफिसचं क्वॉरंटाईन सेंटर करण्यासाठी शाहरुखने संपूर्ण ऑफिस रिफर्निश केलं आहे. या ऑफिसचे फोटो आता समोर आले आहेत.


शाहरुखची पत्नी गौरी खानने इंस्टाग्रामवर या ऑफिसचा व्हिडीओ शेअर केला आहे. या ऑफिसचं इंटिरिअर आपण स्वत: केल्याचं गौरी खानने सांगितलं. हा व्हिडीओ शेअर करताना गौरी खानने म्हटलं आहे, गौरी खान डिझाईन्सने हे ऑफिस रिफर्निश केलं आहे. आता हे क्वॉरंटाईन सेंटर असून लोकांना गरजेच्या सेवांसाठी याचा वापर होणार आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र उभं राहावं लागेल. या ऑफिसमध्ये सध्या 22 बेडची सोय करण्यात आली आहे. या बेड्सना काही अंतरावर ठेवण्यात आलं आहे.





काही दिवसांपूर्व मुंबई महानगरपालिकेने शाहरुख आणि गौरी खान यांचं यासाठी आभार मानले होते. यावेळी मुंबई महापालिकेने सोशल मीडियावर म्हटलं होतं की, आम्ही शाहरुख आणि गौरी खान यांचे आभार मानतो. त्यांनी गरजेच्या सामानांसह त्यांचं चार मजली खासगी ऑफिस क्वॉरंटाईन सेंटर बनवण्यासाठी दिलं आहे. आमच्या गरजेच्या वेळी त्यांनी ही मदत केली आहे.


याआधी शाहरुखने कोरोनच्या संकटात आर्थिक मदतही केली आहे. शाहरुखच्या मीर फाऊंडेशने काही इतर फाऊंडेशनच्या मदतीने जवळपास 5500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जवळपास एक महिना 5500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था आणि काही जीवनावश्यक वस्तू शाहरुखच्या मीर फाऊंडेशनच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत.