धबधब्यात बाहुबली स्टाईल उडी मारण्याच्या नादात जीव गेला
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2017 10:49 PM (IST)
बाहुबली सिनेमात प्रभासनं जशी धबधब्यावरून उडी मारली, तशी उडी मारण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा मृत्यू झाला.
कल्याण: बाहुबली सिनेमात प्रभासनं जशी धबधब्यावरून उडी मारली, तशी उडी मारण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा मृत्यू झाला. इंद्रपाल पाटील असं या तरुणाचं नाव आहे. भिवंडी तालुक्यातल्या आमणे गावात राहणारा इंद्रपाल पाटील हा 27 वर्षांचा तरुण 14 जुलै रोजी शहापूरजवळच्या माहुली किल्ल्याच्या परिसरात मित्रांसोबत पिकनिकसाठी गेला होता. यावेळी त्यानं केलेलं एक साहस त्याला चांगलंच महागात पडलं. त्याने धबधब्याच्या वर चढून खाली पडणाऱ्या पाण्यात उडी मारली, मात्र यात त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार एका पर्यटकाच्या मोबाईल कॅमे-यात कैद झालाय. या घटनेनंतर धबधब्यासारख्या ठिकाणी किंवा कुठेही पिकनिकला गेल्यानंतर नको ते धाडस करणं टाळायला हवं, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.