नवी मुंबई : नवी मुंबईमधील नेरुळ सेक्टर 8 मध्ये महात्मा गांधी मिशन शाळेत 13 वर्षांच्या मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . सातवीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतच आरोपी शिक्षकाने अत्याचार केल्यानं ती गरोदर राहिली होती. ऑक्टोबर महिन्यात मुलीचा गर्भपात केला आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे.
नेरुळमधील शाळेत एका सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपी शिक्षक हरिशंकर शुक्ला हा सातवीच्या वर्गाला इंग्लिश शिकवत होता. एप्रिल महिन्यात पहिल्यांदा वर्गातील सर्व मुले पीटी तासासाठी वर्गाबाहेर गेल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केले. यानंतर त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास सांगितलं. घडलेला प्रकार मुलीने घरात न सांगितल्याने आरोपी हरिशंकर शुक्ला याने ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा शाळेतच लैंगिक अत्याचार केले. यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीचा मनपाच्या वाशी रूग्णालयात गर्भपात करण्यात आला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
नेरुळच्या एमजीएम शाळेत घडलेला प्रकार समोर येऊ नये म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. शाळेने आरोपी शिक्षकाला पाठीशी घातले असल्याने शाळेवर कारवाई करण्याची मागणीही वडिलांनी केली आहे. यादरम्यान नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
आरोपी शिक्षक हरिशंकर हा नेहमीच मुलींना छेडत होता. अश्लिल टिप्पणी करीत होता. याबाबत पालकांनी शाळा मुख्याध्यापकांकडे तक्रार करुनही त्यांनी दुर्लक्ष केल्यानं हा प्रकार घडल्याचं पालकांचं म्हणणं आहे.