नवी मुंबई : खारघरमध्ये सात वर्षांच्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. शाळेतीलच एका शिपायाने विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं आहे. सूर्यकांत चिखलीकर असे शिपायाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


नवी मुंबईतील खारघर सेक्टर 13 मधील केपीसी शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. एका मोकळ्या वर्गात या शिपायाने विद्यार्थ्यासोबत अश्लिल चाळे करत अनैसर्गिक संभोग केला. त्यामुळे विद्यार्थ्याच्या गुप्तांगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्याला चालताना त्रास होत होता.

पालकांनी विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन विचारलं असता त्याने सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तातडीनं शाळेतील शिक्षकांना याबाबत माहिती दिली. मात्र शाळेतील शिक्षकांनी पालकांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नसल्याचा आरोप पालकांनी केला. त्यानंतर पालकांनी थेट खारघर पोलीस ठाणे गाठत शिपायाविरोधात तक्रार दाखल केली.

पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा करुन आरोपी शिपायाला अटक केली. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले असून ते तपासण्याचे काम सध्या सुरु आहे. तसंच या आरोपीनं अजून कोणत्या विद्यार्थ्यासोबत असा प्रकार केला आहे का? याचीही चौकशी पोलीस करत आहेत.