मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज कमालीची घसरण पाहायाला मिळाली. लक्ष्मीपूजनादिवशी खास ट्रेडिंगदरम्यान सेंसेक्समध्ये 194 अंकांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 10150 पेक्षा कमीने बंद झाला.


दरवर्षी लक्ष्मीपूजनानंतर एक तास शेअर बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु राहतात. यावेळी खासगी बँकिंग सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. खासगी क्षेत्रातील बँकांमधील सेक्टर इंडेक्समध्ये 1.37 टक्क्यांनी घट झाली. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 0.7 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

याशिवाय, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील इंडेक्समध्ये 0.8 टक्के घट नोंदवण्यात आली. तर ऑटो सेक्टरमध्येही 0.54 टक्के, एफएमजीसी (म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तू) सेक्टरमध्ये 0.41 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

सर्वाधिक घसरण ही अदानी पोर्ट्स होती. अदानीचे स्टॉक 2 टक्क्यापेक्षा जास्तने घसरले. तर कोटक महिंद्रा, एनटीपीसी, येस बँक, अंबुजा सिमेंट, कोल इंडियाच्या स्टॉकमध्ये 1.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली.

तर दुसरीकडे भारती एअरटेलचे स्टॉक वधारल्याचं पाहायला मिळालं. भारती एअरटेलचे स्टॉक 2 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. तर एम.अँड एम., इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, इन्फोसिस, यूपीएल, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक आदी कंपन्यांचे शेअर वधारले. पण या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये अर्धा टक्क्यांचीच वाढ नोंदवली गेली.

दरम्यान, लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावेळी शेअर बाजारातील घसरण नवीन नाही. पण आजची घसरण ही विक्रम संवत 2074 मधील सर्वात मोठी घसरण होती. त्यामुळे याचा जागतिक बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आङे. आजच्या शेअर बाजाराच्या व्यवहारांवर यूरोपियन देशातील केटेलेनियाचा परिणाम पाहायाला मिळाला.