मुंबई : छगन भुजबळांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये करा, असा आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. पैशांच्या अफरातफरप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सध्या अटकेत आहेत. छगन भुजबळांची अँजिओग्राफी करायची की नाही हे त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून ठरवा. त्यानंतर गरज असेल तर त्यांना रुग्णालयात नेऊ शकता, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
हायकोर्टाने जामीन फेटाळला! त्याआधी मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भुजबळांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. तसंच भुजबळांचा हायकोर्टातील हा शेवटचा जामीन अर्ज होता. आता जामीनासाठी त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे.
भुजबळांचा लेटेस्ट फोटो 'माझा'च्या हाती दरम्यान भुजबळांचा लेटेस्ट फोटो माझाच्या हाती लागला आहे. दाढी पांढरी झालेले भुजबळ या फोटोमध्ये चालताना दिसताहेत.. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे भुजबळ सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. भुजबळ हॉस्पिटलच्या लॉबीत फिरताना दिसत आहेत. त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला होता. त्यानंतर हा फोटो समोर आला आहे.
भुजबळांना अटक पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.
संबंधित बातम्या