मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आज पार पडत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. एकूण 53 मतदान केंद्रावर निवडणूक सुरू असून 68 उमेदवार रिंगणात आहेत.


प्रामुख्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिधुंदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मतदान सुरु आहे. एकूण 62 हजार पदवीधर मतदार यासाठी मतदान करतील. 2010 साली मुंबईची निवडणूक शिवसेनेच्या युवासेनेने जिंकली होती. पण यंदा युवासेनेसमोर भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेसप्रणीत एनएसयूआयच्या उमेदवारांचं तगडं आव्हान आहे.

त्यामुळे यावेळी निवडणुकीत कोण बाजी मारतं, हे पाहावं लागेल. दरम्यान, उद्या म्हणजे 26 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. शिवाय मतदारांना मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्याचंही आव्हान केलं.